Saturday, 14 July 2012

तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती...?

महात्मा ज्योतिराव फुले कुणबी, माळी, मांग, महार या जातींचा उल्लेख एकत्रितपणे करतात, फुल्यांच्या संपूर्ण वाङ्मयात असे उल्लेख ठिकठिकाणी येतात. ‘ब्राह्मणांचे कसब' हा ग्रंथ फुले यांनी या जातींनाच अर्पण केला आहे. अर्पण पत्रिकेत फुले म्हणतात, ‘महाराष्ट्र देशांतील कुणबी, माळी, मांग, महार यांस हे पुस्तक ग्रंथकत्र्याने परम प्रीतीने नजर केले असे'. यावरून फुले यांची या जातींविषयी असलेली तळमळ दिसून येते. आपण मराठा-कुणबी हे एक असल्याविषयीचा महात्मा फुले यांचा अधिक स्पष्टपणे समोर येणारा अभिप्राय पाहणार आहोत. फुले यांचे ‘शेतकरयाचा असूड' हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. हे पुस्तक लिहित असताना फुले यांची अनेकांशी चर्चा झाली. त्यातील दोन गृहस्थांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील ज्योतिरावांनी पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टात दिला आहे. त्यातील पहिल्या परिशिष्टाचे शीर्षक आहे ‘खासा मराठा म्हणविणाराङ्क. हे शीर्षकच अन्वयर्थक आहे. फुले यांची लेखनकामाठी सुरू असताना एक गृहस्थ त्यांच्या घरी येतात. गृहस्थांसोबत झालेला चर्चेचा तपशील फुले यांनी या परिशिष्टात दिला आहे. त्यातील काही अंश पुढे देत आहे- ‘‘त्यांनी (फुले यांच्याकडे आलेल्या गृहस्थाने) आपला मोहरा मजकडे फिरवून , आपणहूनच मला प्रश्न केला की, तुम्ही मला ओळखले नाही काय?'' मी म्हणालो, ‘‘नाही महाराज, मी तुम्हाला ओळखले नाही. माफ करा.'' गृहस्थ म्हणाला, ‘‘मी मराठी कुळातील मराठी आहे.'' मी - तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती?'' गृ. - ‘‘माझी जात मराठे'' मी - ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात. तरी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगडा तेवढ्याने होत नाही.'' गृ. - ‘‘तर मी कुणबी आहे असे समजा.'' महात्मा फुले यांनी दिलेला हा संवाद इतका स्पष्ट आहे की, मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे सांगण्यासाठी आणखी वेगळा पुरावा देण्याची गरजच राहिलेली नाही. ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात.ङ्कङ्क हे महात्मा फुले यांचे वाक्य ऐतिहासिक सत्य आहे. महाराष्ट्रातील फौज कोणाच्याही नेतृत्वाखाली लढली, तरी तिला मराठा फौज असेच म्हटले जात असे. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील प्रत्येक शिपाई हा मराठा म्हणूनच ओळखला जात होता. पेशवाईच्या काळात मराठे पाणिपतावर लढले. तेव्हा या फौजेला कोणी पेशव्यांची फौज म्हटले नाही. तिला मराठ्यांची फौज असेच म्हटले गेले. आजही महाराष्ट्राबाहेर मराठी लोकांना मराठे असेच म्हटले जाते. त्यामुळे मराठ्यांची खरी जात कुणबी हीच आहे, हे सिद्धहोते...!!!

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.