Friday, 24 August 2012

V.B.V.P.विद्यार्थांना दिशा देणारी संघटना


भारत  - जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश.
- जगात लोकसंख्येत दोन नंबरचा देश.
- अनेक परकीय आक्रमणे पाहिलेले, आक्रमणे पचवलेला देश.
- एकेकाळी स्वयंपूर्ण खेडी असलेला देश.
- एकेकाळी टाचणी न तयार होणारा व आज उपग्रह तयार करणारा देश .
- सर्व जगाला मजूर, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पुरविणारा देश.
- क्रिकेटमध्ये 'वर्ल्डकप' जिंकणारा देश.
- इ.स.२०२० ला जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा देश.
दुसरी बाजू - शेतकर्यांच्या आत्महत्या होणारा देश.
- धार्मिक, जातीय दंगली करणारा देश.
- कर्मकांडात अडकलेला देश.
- तरुणांच्या हाताला काम व बुद्धीला दिशा न मिळालेला देश.
- ऑलीम्पिक २०१२ लंडन मध्ये एकही सुवर्ण पदक न मिळालेला देश.
- स्त्री अर्भकांचा गर्भपात करणारांचा देश.
         भारत इ.स. २०२० ला महासत्ता होणार अशी चर्चा सध्या भारतामध्ये विद्वान व प्रचार प्रसार माध्यमे करत आहेत. इ.स. २०२० यायला अजून आठ वर्षे बाकी आहेत. या आठ वर्षात भारत महासत्ता होणार म्हणजे नेमके काय होणार? हे ज्यांच्या सामर्थ्यावर भारत देश महासत्ता बनवायचा त्या तरुणांनाच नेमके कळलेले नाही. भारत महासत्ता बनणार म्हणजे नेमके काय? आम्ही सैनिकी हल्ले करून सर्व जग ताब्यात घेणार ? आमच्या भारतीय कंपन्या इतर देशात जाऊन सर्व व्यापार ताब्यात घेणार? नेमके काय करणार? हेच भारतीय तरुणांना नेमके माहित नाही. बर्याच तरुणांना तर तालुका, जिल्हा, राज्य, देश, खंड यातील फरकही निट कळत नाही. मग भारत महासत्ता होणार कसा? बरे क्रिकेट सारखी महासत्ता होण्याची काही स्पर्धा आहे का? म्हणजे अंतिम सामना फिक्सिंग करून जिंकावा व भारताला महासत्ता बनवावे अशी काही तरतूदही नाही. या देशातील तरुणांना महासत्ता होणे म्हणजे काय? हेच अजून माहित नाही आणि आम्ही भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहत आहोत.
         स्वप्न पाहणे गुन्हा नाही. स्वप्न पाहण्याला ट्याक्सहि नाही. मोठी स्वप्ने अवश्य पहावितच परंतु या स्वप्नपूर्ती साठी नियोजन नावाचा काही भाग असतो. त्या नियोजनाची अंमलबजावणी व्हावी लागते. या अंमलबजावनीला प्रतिसाद मिळावा लागतो त्यासाठी अहोरात्र कष्ट करून झोकून देणारी माणस निर्माण करावी लागतात नव्हे अशी मानस निर्माण व्हावी लागतात तरच या स्वप्नांची पूर्तता होत असते. मला सांगा भारत महासत्ता बनविण्याचे कोणते प्रयत्न या देशात होत आहेत? ज्या देशात मुलगी नको वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा हट्ट धरला जातो . बरे मुलगा झाल्यावर त्याला दिशा देण्याचा त्याच्यावर काही संस्कार करण्याचा प्रयत्न पालक करत आहेत काय? माझे तर असे मत आहे कि घरात जसे कुकर, फ्यान, मिक्सर, ग्यास, फ्रीज असावे तसा मुलगाही असावा अशी आमच्या समाजाची मनोवृत्ती आहे. मुलगा होत नसेल तर बाराभानगडी करून पाण्यासारखा खर्च करतील, पैसे नसतील तर कर्जबाजारी होतील पण मुलगा होण्यासाठी गंड्या दोर्यापासून टेक्सट्यूब बेबीपर्यंत प्रयत्न करतील. मुलगा झाल्यावर प्रचंड खर्च करून वाढदिवस  साजरा करतील परंतु त्या मुलावर शिक्षणासाठी, विविध कला शिकण्यासाठी पुन्हा खर्च करणार नाहीत. भारताला आत्ता ऑलीम्पिक मध्ये एकही सुवर्ण पदक मिळाले नाही म्हणून बोंबलनारे आपला मुलगा, मुलगी ग्राउंडवर जाणार नाही याची काळजी घेतात. बरे या मुलांसाठी मोकळी जागा राहिली कोठे? की जेथे मुलांनी जाऊन खेळावे, खेड्यात पूर्वी गायरान असायचे ते गेले. शहरात अतिक्रमणे वाढली सोसायटीच्या मोकळ्या जाग्यावर चढाओढीने मंदिरे बांधली, मुले खेळणार कोठे? एखाद्याला फारच इच्छा झाली तर त्याला क्रीडा साहित्य उपलब्ध होत नाही, झाले तर महाग. शाळेत खेळाचातास नाही, असेल तर क्रीडा शिक्षक  नाही, तो असेल तर त्यालाच खेळाची आवड नाही. खेळाडू घडणार कसे? गजगे, गोट्या, लंगडी,हुतुतू,सूरपारंभ्या, लगोरचे आमचे हे खेळ आंतरराष्ट्रीय नाहीत व आंतरराष्ट्रीय खेळ आम्हाला येत नाहीत. सुवर्ण पदक मिळणार कसे?
              अजूनही आमच्या देशातील तरुणांना देशावर प्रेम करणे याचा अर्थ फक्त सैन्यात जाऊन हातात बंदूक घेऊन सीमेवर उभे राहणे म्हणजे देशप्रेम समजतात. या देशाला खेळात सुवर्ण पदक मिळवून देणे, शेतीतील उत्पन्न वाढविणे, उद्योगधंद्याची प्रगती करणे, नवीन नवीन तंत्रज्ञान निर्माण करणे, धरणे बांधणे, कालवे काढणे, सैन्यात भरती होणे, मोठमोठ्या इमारती उभारणे, रस्ते बांधणे, रेल्वे जाले निर्माण करणे, प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडणे, विध्यार्त्याना शिकविणे, विज्ञाननिष्ठ अभ्यासक्रम निर्माण करणे, इच्छाशक्ती व नजर असलेली मानस निवडून देणे, निवडून आल्यावर देशासाठी आहोरात्र काम करणे, वक्ता, लेखक, नाटककार, शाहीर, चित्रकार, पत्रकार, कीर्तनकार होऊन मनोरंजनातून जनजागृती करणे, डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे थोडक्यात आपण आहोत त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणे म्हणजेच देशसेवा असते. अगदी तुम्ही परदेशात जाऊन परकीय चलन देशात पाठविणे ही सुद्धा देशसेवाच आहे. त्यामुळे फक्त सैन्यात जाने म्हणजेच देशसेवा हे अगोदर तरुणांच्या डोक्यातून जाने अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की सैन्यात गेल्यावर देशसेवा होत नाही. सैन्यात गेल्यावर तर देशसेवा होतेच तसेच या देशात राहून रस्ता झाडण्यापासून मोठमोठ्या बिल्डींग बांधण्यापासून स्वयंपाकी होण्यापर्यंत कोणतेही कार्य झोकून देऊन करणे म्हणजेच देशसेवा असते. हा विचार तरुणापर्यंत गेला की भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
                भारतात अजूनही तरुणशक्ती दुर्लक्षित आहे. लहानपणापासून श्रमप्रतिष्ठा मूल्य समजाविणे अत्यावश्यक आहे मुलावर संस्कार होणे, त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यावश्यक आहे दुर्देवाने असे होत नाही. या देशातील बालकांसाठी बालसाहित्य उपलब्ध नाही. त्यांना कोणीही स्वप्न दाखवीत नाही, प्रेरणा देत नाही, लहानपणी आई म्हणते 'जन्मल्या जन्मल्या नख लावलं असते तर बरे झाले असते'. वडील म्हणतात 'वाया गेलेलं पोरग आहे'. शाळेत जावे तर शिक्षक म्हणतात 'काहीच येत नाही नालायक बस खाली'. यातून काय प्रेरणा घेणार बोला?
                या सर्वांचा अभ्यास करून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुशोत्तमजी खेडेकर यांनी वीर भगतसिंह विध्यार्थी परिषद या मराठा सेवा संघाच्या स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून या देशातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखविणे, त्यांना प्रेरणा देणे, त्याच्यातील सुप्तगुणांना हेरून त्यांची सर्वांगीण प्रगती करणे या हेतूने VBVP ची स्थापना केलेली आहे.
                आज महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात VBVP कार्यरत असून २८ नोव्हे २०१२ ला माजलगाव जि.बीड येथे VBVP चे राज्य अधिवेशन असून नोव्हे २०१३ ला औरंगाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे नियोजन सुरु आहे. महाराष्ट्रातील विध्यार्थी VBVP कडे प्रेरणा देणारी, दिशा देणारी संघटना म्हणून पाहत आहे कारण VBVP मध्ये विध्यार्त्याचा वापरा आणि फेकून द्या असा ' कडीपत्ता' होणार नाही. वकृत्व, नेतृत्व,कर्तृत्व याचे प्रशिक्षण देणारी ही संघटना असून मोठे झाल्यावर समाजाकडे 'वळून पाहणारे' नागरिक यातून निर्माण होणार आहेत.  VBVP म्हणजे जगाला गवसणी घालणारे नागरिक निर्माण करून भारत महासत्ता बनविणारे संघटन आहे.
परवा एक sms आला तो पुढील प्रमाणे 
' इस देश का क्या होगा क्योंकी 
 बुढे लोग देश चला रहे है और
 जवां लोग फेसबुक खेळ रहे है ! '
या फेसबुक खेळणाऱ्या तरुणांना देश चालविण्यास सक्षम करणे व त्यातून व्यवस्था परिवर्तन करणे हेच VBVP चे अंतिम उद्दिष्ट आहे.






                    -प्रदीप सोळुंके
                     प्रदेशाध्यक्ष
                     वीर भगतसिंह विध्यार्ती परिषद,
                     मोब. ९४२२२९५१५२

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.