Wednesday 18 July 2012

साहित्य सम्राट : अण्णाभाऊ साठे

आजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या? कारण, कादंबऱ्यातच लेखकाची सर्व शक्ती पणाला लागते ! कादंबरीतच लेखकाच्या पूर्ण विचारशक्तीची जाण होते. लेखकाला हे सर्व कथात्मक कसे सुचत असावे, स्वतःस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही! लेखकाचीच विचारशक्ती पडद्याबिगर आपल्या डोळ्यासमोर कादंबरीतील घटनाचीत्र दाखवत असते. कथेतील चुरस जाणून घेण्यात आपण कादंबरी वाचनाच्या ओढीला लागतो. हे लेखकाला सुचलेल्या कथेमुळे, प्रसंगामुळे, पात्रांमुळे शक्य होते. यात आज आम्हाला आण्णाभाऊ साठेंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, त्या काळात जातीवादामुळे आण्णाभाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले. मातंग समाजातील मुलगा म्हणून ब्राह्मण मास्तरांनी अण्णाभाऊ साठेंना शाळेतून बाहेर काढले. परंतु आज आण्णाभाऊ साठेंची लौकिकता सांगावी लागत नाही. दीड दिवस शाळेत गेलेले आण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' नावाची कादंबरी M. A.च्या अभ्यासक्रमात आहे. आण्णाभाऊ साठेंनी तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज, कवड्याचे कणीस, पाझर, वैर, डोळे मोडीत राधा चाले, गुलाम, चित्रा, धुंद रानफुलाचा, रानगंगा, मास्तर, मंगला, जीवंत काडतूस, तास, संघर्ष, रूपा, रानबोका, फुलपाखरू अशा त्यांच्या काही कादंबऱ्या. 'फकिरा'सारख्या काही सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. ३५ पैकी ७ कादंबऱ्यावर चित्रपट बनवण्यात आले. अण्णाभाऊ साठेंचा कथासंग्रह खूप मोठा होता. बरबाद्या कंजारी, फरारी, लाडी, भानामती, पिसाळलेला माणूस, चिरानगरची भुतं, निखारा, नवती, आबी, गजाआड, क्रुष्णा काठच्या कथा, खुळंवाडी अशी तब्बल तेरा नाटकं आण्णाभाउंनीप्रसिद्ध केली. सुलतान , पेंग्याच लगीन, इनामदार यांचाही या यादीत समावेश आहे. याबरोबर साठेंनी शिवरायांचा स्वराज्य संदेश ही पोवाड्यातून लोकांपर्यंत पोहचवला, म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. याचबरोबर यांनी नेसरीच्या खिंडीतमृत पावलेल्या प्रतापराव गुजर अशा पराक्रमीमावळ्यांवर 'अग्निशिखा' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, कलंत्री, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक्, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा असे अनेक तमाशेही साठेंनी प्रसिद्ध केले. 'माझा रशियातील प्रवास' हे साठेंचे प्रवास वर्णन ही रशियात प्रसिद्ध झाले. याच बरोबर नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्याबाजाराचा पोवाडा असे त्यांचे सु-प्रसिद्ध पोवाडे. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटयेअण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले. सांगली जिल्ह्यातील खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे फक्तसाहित्य सम्राटच नव्हे तर समाजसुधारकही होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्याचळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे. अण्णाभाऊ लावण्या, शाहिरी, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. यातून अण्णाभाऊ साठेंची कारकीर्द आजही चालू आहे. आपल्यासारख्या नवख्यांना याच्यामुळेच प्रेरणा मिळते म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना स्मरूनच लेखणी उचलतो! ३६५ दिवसापैकी १ दिवस मराठी दिन साजरा केला जातो,उरलेले ३६४ दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावे मराठी दिन साजरा करूयात.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.