Showing posts with label अण्णाभाऊ साठे. Show all posts
Showing posts with label अण्णाभाऊ साठे. Show all posts

Tuesday, 31 July 2012

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दरिद्रे असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरीबच निरक्षर पोर.!! गावाच्या शाळेत नाव घालण्या साठी व दुसऱ्यादिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाउंचा शाळा व शिक्षणाचा संबंध. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. अण्णाभाउ मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्यातला मराठी माणूस जागा करीत होते. अण्णाभाउंनी एकूण पुस्तके/ग्रंथ संख्या"७७" आहे, अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशिअन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशिया च्या राष्ट्रपती कडून त्यांचा सन्मान देखील झाला, तमाश्यात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाउंनी झिडकारून व मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी, "प्रथम मायभूच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा स्मरोनी गातो | कवना ||" "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली" हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र देखील अण्णाभाउंनी लोककलातून समाजास दिलेल्या दिव्या दृष्टीमुळेच साकार झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली "ये आझादी जुठी हे देश किजनता भुकी हे" असा नारा शिवाजी पार्क वर दिला तेव्हा त्या दिवशी रौद्र रूप धारण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही, तरी अण्णाभाऊ मागे हटले नाहीत. अण्णाभाउंच्या वैजयंता, आवडी, माकडीचा चाल, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकीर या सात कादंबऱ्यावर मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले. चार चित्रपटांना विविध पारितोषिके मिळाली, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून राजकीय क्रांती व सामाजिक परिवर्तन झाले. अण्णाभाउंना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले!! याउलट, कुसुमाग्रज हे पुण्यातील श्रीमंत घरातील होते पुण्यात शिक्षण झाले तसेच उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये, पुढील आयुष्य अमराठी लोकांची चाकरी करण्यात घालवली, तसेच१४(कादंबरी, ललित लेख, कविता संग्रह, नाटक)+अनुवादित बरेच लिखाण केले, पण कुठेही मराठी, भूमिपुत्र, संघर्ष, श्रमकरी, कष्टकरी,शेतकरी यांच्या व्यथा मांडल्या नाहीत शिवाय त्यांना पेशवाई व बामन शाहीची आग नव्हती, आणि सांगतात आयुष्य भर मराठी ची सेवा केली, त्यांना ८७ वर्षाचे आयुष्य लाभले........!! ....पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल वातावरणात, परंपरागत निरक्षर वातावरणात, वाईट-रुढ्या परंपरा जोपासणाऱ्या समाजात धर्मानेच शिक्षण-सत्ता-संपती नाकारलेल्या समाजात, अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात, शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्याजातीत जन्माला येऊन संपूर्ण जगाला ज्ञानी वस्वावलंबी करणारे महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, साहित्य सम्राट अण्णाभाउ साठे, शाहीर अमरशेख, बहिणाबाई, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, डॉ. सरोजिनी बाबर, संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कृ.बा. बाबर, अश्या अनेक बहुजनांनी कुसुमाग्रजांपेक्षा लाखो पटीने लिखाण केले, मराठी भाषाच नव्हे तर भाषा-प्रांत समुद्ध केला, ते कोणीही बामन नव्हते हीच कमतरता आहे. म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील मराठी साहित्य, शिवचरित्र परदेशात प्रसार करणाऱ्या साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्मदिन १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !!

Wednesday, 18 July 2012

साहित्य सम्राट : अण्णाभाऊ साठे

आजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या? कारण, कादंबऱ्यातच लेखकाची सर्व शक्ती पणाला लागते ! कादंबरीतच लेखकाच्या पूर्ण विचारशक्तीची जाण होते. लेखकाला हे सर्व कथात्मक कसे सुचत असावे, स्वतःस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही! लेखकाचीच विचारशक्ती पडद्याबिगर आपल्या डोळ्यासमोर कादंबरीतील घटनाचीत्र दाखवत असते. कथेतील चुरस जाणून घेण्यात आपण कादंबरी वाचनाच्या ओढीला लागतो. हे लेखकाला सुचलेल्या कथेमुळे, प्रसंगामुळे, पात्रांमुळे शक्य होते. यात आज आम्हाला आण्णाभाऊ साठेंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, त्या काळात जातीवादामुळे आण्णाभाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले. मातंग समाजातील मुलगा म्हणून ब्राह्मण मास्तरांनी अण्णाभाऊ साठेंना शाळेतून बाहेर काढले. परंतु आज आण्णाभाऊ साठेंची लौकिकता सांगावी लागत नाही. दीड दिवस शाळेत गेलेले आण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' नावाची कादंबरी M. A.च्या अभ्यासक्रमात आहे. आण्णाभाऊ साठेंनी तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज, कवड्याचे कणीस, पाझर, वैर, डोळे मोडीत राधा चाले, गुलाम, चित्रा, धुंद रानफुलाचा, रानगंगा, मास्तर, मंगला, जीवंत काडतूस, तास, संघर्ष, रूपा, रानबोका, फुलपाखरू अशा त्यांच्या काही कादंबऱ्या. 'फकिरा'सारख्या काही सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. ३५ पैकी ७ कादंबऱ्यावर चित्रपट बनवण्यात आले. अण्णाभाऊ साठेंचा कथासंग्रह खूप मोठा होता. बरबाद्या कंजारी, फरारी, लाडी, भानामती, पिसाळलेला माणूस, चिरानगरची भुतं, निखारा, नवती, आबी, गजाआड, क्रुष्णा काठच्या कथा, खुळंवाडी अशी तब्बल तेरा नाटकं आण्णाभाउंनीप्रसिद्ध केली. सुलतान , पेंग्याच लगीन, इनामदार यांचाही या यादीत समावेश आहे. याबरोबर साठेंनी शिवरायांचा स्वराज्य संदेश ही पोवाड्यातून लोकांपर्यंत पोहचवला, म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. याचबरोबर यांनी नेसरीच्या खिंडीतमृत पावलेल्या प्रतापराव गुजर अशा पराक्रमीमावळ्यांवर 'अग्निशिखा' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, कलंत्री, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक्, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा असे अनेक तमाशेही साठेंनी प्रसिद्ध केले. 'माझा रशियातील प्रवास' हे साठेंचे प्रवास वर्णन ही रशियात प्रसिद्ध झाले. याच बरोबर नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्याबाजाराचा पोवाडा असे त्यांचे सु-प्रसिद्ध पोवाडे. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटयेअण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले. सांगली जिल्ह्यातील खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे फक्तसाहित्य सम्राटच नव्हे तर समाजसुधारकही होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्याचळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे. अण्णाभाऊ लावण्या, शाहिरी, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. यातून अण्णाभाऊ साठेंची कारकीर्द आजही चालू आहे. आपल्यासारख्या नवख्यांना याच्यामुळेच प्रेरणा मिळते म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना स्मरूनच लेखणी उचलतो! ३६५ दिवसापैकी १ दिवस मराठी दिन साजरा केला जातो,उरलेले ३६४ दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावे मराठी दिन साजरा करूयात.