Friday, 3 February 2012

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP )

"क्रांती जगाचा नियम आहे.ती मानवाच्या प्रगतीचे रहस्य आहे.त्यामध्ये रक्तरंजित संघर्ष असतोच असे नाही.त्यात व्यक्तिगत प्रतीहीन्सेलाही काहीच स्थान नाही.तो बॉम्ब आणि पिस्तुलाचा संप्रदाय नाही.क्रांतीचा आमचा अर्थ अन्यायाच्या पायावर आधारलेली आजची राज्यव्यवस्था बदलणे हा आहे." शहीदे आलम वीर भगतसिंग यांनी वयाच्या २०-२१ व्या वर्षी क्रांतीची केलेली ही परिपक्व व्याख्या आहे.मराठा सेवा संघ प्रणीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची वाटचाल भगतसिंगांच्या याच क्रांतीमार्गावरून सुरु आहे.भिकाऱ्याला भीक देणे ही सेवा आहे.परंतु त्याच्यावर भीक मागण्याची वेळच येणार नाही,अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे परिवर्तन आहे आणि हेच परिवर्तन राज्याव्यापी राष्ट्रव्यापी करणे म्हणजे क्रांती आहे.या क्रांतीच्या प्रस्थापनेसाठीच मराठा सेवा संघाचा १९९० पासून विविध ३१ कक्षांच्या माध्यमातून निकराचा संघर्ष सुरु आहे.वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP ) हा त्या ३१ कक्षांपैकी एक प्रभावी कक्ष आहे.
          अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार ,अशिक्षित-शिक्षित-सुशिक्षित बेकारी, दारिद्र्य तसेच जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, पंथवाद, धर्मवाद, आतंकवाद, हे सर्ववाद आणि अर्थिक, सामाजिक,राजकीय, प्रशासकीय, धार्मिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक अशा सर्वप्रकारच्या देशी-परदेशी दह्शदवादामुलेच १९४७ साली साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य काळवंडून गेलेय.शूर वीरांच्या बलिदानाने तिरंगा शेकडो वेळा भिजून निघाला, धरणीमाय हजारो वेळा रक्ताळली, लाखो सामान्य माणसांना निसर्गाने जगण्याचा दिलेला अधिकार या सर्व वादांनी किती तरी वेळा हिरावून घेतला आहे.या सर्व घटनांमुळे अर्धशतक पार करून गेलेय भारतीय ‘स्वातंत्र्य'अधिकाधिक परिपक्व होण्याऐवजी डागाळत चालल आहे.हे सर्व प्रकारचे अनर्थ आणि भारतभूमीची विटंबना थांबावी प्रत्येक व्यक्ती कर्त्यव्यभावनेने पेटून उठावी,घरा-घरातील कोपरान-कोपरा स्वातंत्र्याच्या उर्जेने उजळून निघावा आणि भारताचा तिरंगा प्रचंड तेजाने अखंड तळपत राहावा , अशी मनोमन इच्छा असणाऱ्या रग आणि धग उरत सामावत सळसळत्या रक्ताच्या तरुण विद्यार्थ्यांची विद्यार्थी परिषद म्हणजेच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ( VBVP )आहे. भगतसिंगांचा आचार आणि विचारच नाही तर अख्खा भगतसिंगच डोक्यात जीरविनारया आणि त्यांचे आचार-विचार मेंदूत मुरविनाऱ्या विद्यार्थ्यांची परिषद म्हणजे VBVP आहे.
                 वीर भगतसिंगांना पिस्तुल-बॉम्बची क्रांती अपेक्षित नव्हती.त्याप्रमाणे VBVP ला ही ती अपेक्षित नाही.अन्याय-अत्याचार दह्शदवादाच्या पायावर आधारलेली समाजव्यवस्था -धर्मव्यवस्था - राज्यव्यवस्था -शिक्षणव्यवस्था बदलायची तर आहेच परंतु त्यासाठी बंदूक बॉम्ब हातात घ्यायची गरज नाही. ‘आम्हा घरी धन,शब्दाचीच रत्ने | शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू ||शब्दची अमुच्या जीवांचे जिवन | शब्द वाटू धन |जनलोका ||' या जगतगुरू तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे शब्द हेच आमचे शस्त्र आहे.एक शब्द संपूर्ण इतिहास बदलून टाकू शकतो,असं जेष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार म्हणतात.त्यामुळे शब्दांमध्ये प्रचंड ताकद आहे.या शब्दांकडे म्हणजेच ज्ञान,विज्ञान,विद्या याकडे आम्ही दुर्लक्ष केल्याने
               विद्येविना मती गेली,मतीविना गती गेली,
               गतिविना वित्त गेले,वित्तविना शुद्र खचले,
               इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.
अश्या शब्दशस्त्रात आजच्या परिस्थितीचे वर्णन महात्मा जोतीराव फुले यांनी केले आहे.म.फुलेंच्या प्रबोधनाने आमचे डोळे सताड उघडायला हवे होते,पण ते नुसते किलकिलेच झाले.भाती कुप्रबोधानाच्या प्रभावामुळे पुन्हा डोळ्यावर आलेली झापडं उघडून आता नव्या जोमाने ही व्यवस्था बदलण्यासाठी कटिबद्ध व्हावं लागणार आहे. "माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बहुबलाव्र विश्वास आहे.म्हणून मी आशावादी आहे.प्रेषितांनी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याऐवजी आकाशात स्वर्ग दाखवला म्हणून ते निर्माते होऊ शकत नाहीत.आजचा नवा मानव हवेत महाल बांधू इच्छित नाही.त्याने आपल्या स्वर्गाचा पाया पृथ्वीच्या याच भक्कम भूमीत खणण्यास सुरुवात केली आहे." जुनाट अन्यायी-अत्याचारी- जुलमी समाज व्यवस्था - राज्यव्यवस्था उलथून टाकून नवी शोषणरहित- मानवतावादी -विज्ञाननिष्ट समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होत असताना भगतसिंगांचा हा आशावाद नीट लक्षात घेण गरजेच आहे.शिवराय,शंभूराजे ,म.फुले,राजर्षी शाहूजी महाराज,क्रांतिसिंह नाना पाटील,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे महापुरुष योगायोगाने किंवा दैवयोगाने जन्माला येत नसतात.त्यांचे जन्मदाते,त्यांचे संस्कार, सभोवतालचा परिसर,वातावरण,शिक्षण,समाजव्यवस्था,आणि जिद्द,चिकाटी,कठोर परिश्रम, अतिउच्च ध्येय हे सर्व घटक त्यांना घडवत असतात.मोगलांचा नायनाट करण्यासाठी शिवाजी राजांना तळपत्या तलवारी चालविण्यासाठी चार चार हात नव्हते.परंतु शिवरायांच्या सैन्यातला प्रत्येक सैनिक ‘शिवाजी'च होता.त्यामुळे अफाट मोगली सैन्याची मुठभर मावळे दानादान उडवून जायचे.काबुलपासून कंदहारपर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशाचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या औरंगजेबाला दख्खनचा एक खन सुद्धा जिंकता आला नाही.शंभूराजांच्या हत्येनंतरही त्याला डोक्यावरचा मुकुट(पगडी) नशीब झालीच नाही.शेवटी त्याला याच मातीत गाडून घ्यावे लागले परंतु मराठ्यांच राज्य त्याला कधी जिंकता आलं नाही.जोतीराव फुले-अण्णाभाऊ साठे यांना शिवरायांच्या तलवारीसारखीच लेखणी तळपत ठेवण्यासाठी चार हातांची किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विद्वत्तेच्या बळावर येथील गुलामगिरीच्या प्रस्थापित बेड्या कडाकड तोडून टाकण्यासाठी डबल मेंदूची गरज पडली नाही.तात्पर्य सर्व महापुरुषांना सामान्य माणसाप्रमाणेच शारीरिक अवयव असतात पण त्याचा पुरेपूर सुयोग्य वापर करून घेण्याची क्षमता त्यांनी स्वत:विकसित केलेली असते,एवढेच लक्षात घ्यावे.आपलं स्वतःच मन-मनगट-मस्तक-मनका-मन-मेंदू सशक्त करा.त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य-मार्गदर्शन करण्यासाठी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद VBVP स्थापन झालेली आहे.
       इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र करणे,हे एकमेव उद्दिष्ट भगतसिंगांचे कधीच नव्हते.या देशातील अज्ञान,अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात,जात-पंथ-धर्माचा वृथा अभिमान नष्ट व्हावा,माणसानं माणसासोबत माणसासारखं वागावं,सगळीकडे समता-समानता प्रस्थापित व्हावी आणि खऱ्याखुऱ्या मानवतेच अधिराज्य निर्माण व्हावं,अशी भगतसिंगांची मनोमन इच्छा होती.म्हणूनच ते म्हणतात "मानवतावादावर प्रेम करण्यात आम्ही कुनापेक्षाहि कमी नाही.कोणत्याही व्यक्तीचा आम्ही द्वेष करीत नाही.उलट आम्हाला मानवी जीवन अत्यंत पवित्र वाटते.देशाला लांच्छनास्पद असे भेकड हिंसक अत्याचारी आम्ही नव्हेत.आम्ही अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही इतिहास,आपल्या देशाची परिस्थिती व मानवी आकांक्षा यांचे अभ्यासक आहोत." देशाला लांच्छनास्पद भेकड अत्याचारी भगतसिंगाच्या काळात ही होते,तसे ते आजही आहेत.आणि त्याची मुळं शाळा-कॉलेजची भिंती पोखरून आत शिरत आहेत.२० ते २५ वर्ष वयोगटातील मुलं-मुली प्रेमप्रकरणातून आपल आयुष्य उध्वस्त करीत आहेत,प्रसंगी संपवीत आहेत.विद्यार्थ्यांना वाईट व्यसनांच्या जाळ्यात ओढ्ण्यापासून ते त्यांच्याकडून दहशदवादी कारवाया घडविण्यापर्यंत त्यांचा पद्धतशीरपणे वापर करणारी यंत्रणा आपल्या देशात ही कार्यान्वित आहे,ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे.या सर्व प्रकारांपासून विद्यार्थ्यांना अलिप्त ठेवून त्यांना स्वत:च्या घराचे,देशाचे भक्कम भावी आधारस्तंभ म्हणून त्यांची जडणघडण करण्याचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून या परिषदेची वाटचाल सुरु आहे.
          विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे प्रश्न हाताळणे,इतिहासाची जान-वर्तमानाचं भान आणि भविष्याच ज्ञान घेवून आधुनिक जगात टिकण्यासाठी,सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी हुशार,चाणाक्ष विद्यार्थी तयार करणे,एम.पी.एस.सी; यु.पी.एस.सी. सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र चालविणे, विद्यार्थी दशेतच शिकता शिकता कमवावे आणि पुढे कमवत असतांनाही शिकत राहावे असे विद्यार्थी तयार करणे,Every Child Is Special प्रमाणे प्रत्येक विद्यार्थी Special बनविण्यासाठी त्याच्या अंगभूत कला-कौश्यल्ल्यांना १००% फुलविण्यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून VBVP कार्यरत झालेली आहे.या विद्यार्थी परिषदेचे पहिलं -वहिलं अधिवेशन जगातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजेच ३ व ४ जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेलं आहे.या दोन दिवशीय अधिवेशनात सद्याची शिक्षणपद्धती विद्यार्थ्यासमोरील आव्हाने, शिक्षणाचे आधुनिकीकरण आणि विद्यार्थ्यांचा उज्वल भवितव्याचे हमखास मार्ग अशा अनेक विषयांवर विचारांचं आदानप्रदान,चिंतन-मंथन होणार आहे.विद्यार्थ्यांच्या अनेकविध अंगभूत कलाकौशल्याचे प्रकटीकरण-प्रोत्साहन संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.तेंव्हा आपल्या असंख्य विद्यार्थी मित्रांसमवेत जाणकार पालकांनी, शिक्षकांनी तसेच शिक्षणप्रेमी व्यक्तींनी या अधिवेशनात प्रचंड संखेने सहभागी व्हावे.तुम्ही घडा आणि इतरांनाही घडवा.अधिवेशनात सहभागी व्हा. 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.