Monday 26 March 2012

शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल

आई जिजाऊ जिजाऊ.....स्वराज्याची प्रेरणा......जगातील प्रत्येक माणसाने आदराने नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही जिजाऊनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत, ही दिलेली जाणीव होती. छ. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून मावळ्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. हे आपले राज्य आहे, आणि आपण त्यासाठी लढले पाहिजे हा आत्मविश्वास निर्माण केला. आज आपण म्हणतो घराघरात शिवाजी जन्माला यावे, पण शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल हे मात्र सोईस्करपणे विसरून जातो. जिजाऊनी शिवबावर संस्कार केले, शिवबा घडवलेआणि स्वराज्याचे रणशिंग फुंकले. बलाढ्य आदिलशाही, निजामशाही, मुघल या सत्तांना न जुमानता जिजाऊनी शिवबाला लढायला प्रोत्साहन दिले. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचे रक्षण केले. जिजाऊ या स्वत शिकलेल्या होत्या. अक्षरज्ञानाबरोबर घोडयावर बसने, दांडपट्टाचालवणे, तलवारबाजी ई. चे प्रशिक्षण जिजाऊनी घेतले होते. जिजाऊ या अत्यंत संयमी आणि करारी स्वभावाच्या होत्या. गोरगरीबाप्रती आपुलकी आणि दुष्टांना शासन अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. तसेच संस्कार त्यांनीशिवाबावर केले. छ. संभाजीरांवर केले. त्यामुळेच पुढे संभाजी राजांनी शृंगारपुर चे सुभेदार असताना दुष्काळग्रस्त प्रज्येकडून एक वर्ष शेतसारा वसूल न करण्याचा निर्णय घेतला. (तेव्हा संभाजी राजांच्या या उदारपणांचे कौतुक करायचे सोडून ते अकार्यक्षम मंत्री आहेत अशी ओरड त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील नतद्रष्टांनी सुरु केली होती.) संभाजी राजांचे हे वर्तन म्हणजे जिजाऊच्या संस्काराचाच परिणाम नव्हे काय ? छ. शिवरायांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला कडक शिक्षा दिली. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता होय हा संस्कार जिजाऊनी शिवबा आणि शंभूराजांवर केला. जिजाऊनी जे संस्कार आपल्या मुलावर आणि नातवावर केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. त्या संस्कारामुळेच आज या दोन छत्रपतींची नावे घेतली कि आपण आपोआप नतमस्तक होतो. प्रत्येक आईने जर जिजाऊ सारखी भूमिका घेवून अन्याय, विषमता, जातीव्यवस्था याविरुद्ध लढणारे “शिवाजी” निर्माण केले तर पुढील काळात समाजात निश्चितच चांगले चित्र पाहायला मिळेल. आणि मला वाटते हीच जिजाऊ ना खरी आदरांजली ठरेल. जिजाऊच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पुणे वसवले. आज जरी इतिहासकार पुणे वसवण्याचे श्रेय दादोजी कोंडदेव यांना देत असले तरी त्या कार्याचे खरे श्रेय जिजाऊ चे आहे. त्यामुळे पुणे आणि जिजाऊ यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे जिजाऊचे नाव पुण्याला देण्यात यावे अशी सर्व जिजाऊभक्तांची मागणी आहे. - prakash pol www.sahyadribana.com

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.